• Wed. Jul 30th, 2025

लोकशाही न्यायालयात सत्तापेंढाऱ्यांचा जनमतातून निवाडा होणार

ByMirror

Nov 19, 2024

लोकनिवाड्यातून महाराष्ट्रात क्रांती होणार असल्याचा पीपल्स हेल्पलाइनचा दावा

सत्तापेंढारी कुबेरशाही विधानसभा निवडणुकीत धुळीस मिळणार -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालय किंवा भारताच्या निवडणूक आयोगाला ज्या बाबीबद्दल निवाडा देता आला नाही, त्या संदर्भात 23 नोव्हेंबर रोजी लोकशाही न्यायालयात सत्तापेंढाऱ्यांचा जनमतातून निवाडा होणार असल्याचे पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या लोकनिवाड्यातून महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्‍वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.


लोकशाही सामुदायिक उन्नत चेतनेवर चालते आणि त्यामुळेच लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत सत्तापेढारी धार्मिक स्थळ, मंगल कार्यालयांचा वापर पैसे वाटपासाठी करत असून, पैसे वाटपाची जोरदार चर्चा असताना देखील पैसे वाटणारे प्रशासनाला मिळत नाही. मात्र जनतेच्या न्यायालयात याचा निवाडा नक्की होणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


भारतामध्ये लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांचा सर्रास वापर केला जात होता. त्यासाठी अनेक ऋषीमुनींची सत्ता राजसत्ता घेत होती. परंतु पूर्वीच्या आदर्श सल्लागारांची जागा सध्याच्या लोकशाहीमध्ये उन्नत चेतनेच्या मतदारांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेली सत्तापेंढारी कुबेरशाही विधानसभा निवडणुकीत धुळीस मिळणार असल्याचे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले.


ज्यांनी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती पायदळी तुडवली आणि जनतेची संपत्ती घरी वाहून नेण्याचा एक भांडवलशाही मार्ग निर्माण केला, अशा सत्तापेंढाऱ्यांना डिच्चू काव्यातून जनता पायउतार करायला भाग पाडणार आहे. त्यातूनच डिच्चूफत्ते 23 नोव्हेंबरच्या निकालांमध्ये सर्वत्र लोकांच्या लक्षात येणार आहे. मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये मतदार अक्कलमारीचा प्रयोग यशस्वी झाला, परंतु महाराष्ट्रामध्ये जनता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शाने बांधलेली आहे. त्यामुळे मतदारांना विकत घेऊन पाहणारे सत्तापेंढारी यांच्या पदरामध्ये निराशा आल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.


यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने डिच्चू कावा, डिच्चू फत्ते वापरला होता. त्याची प्रचिती विधानसभेत आल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत ज्यांना लोकांनी स्वतःहून सत्ता दिली, त्यांनी लालचीपणाने घराणेशाही सुरू केली. त्याचाच त्यांचा अंत सुरू झाला आणि 23 नोव्हेंबरलालोकशाही न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय होणार आहे. जे काम सर्वोच्च न्यायालय किंवा भारताच्या निवडणूक आयोगाला जमले नाही, ते काम महाराष्ट्राच्या उन्नत चेतनेमुळे जनता करून दाखवणार असल्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *