• Sat. Sep 20th, 2025

जनशिक्षण संस्थेच्या एकता दौडमध्ये युवतींचा सहभाग

ByMirror

Oct 31, 2023

राष्ट्रीय एकात्मता व भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्याची शपथ

अस्पृश्‍यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात वल्लभभाई पटेल यांनी आवाज उठविला -बाळासाहेब पवार

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेच्या कार्यालयात भारताचे लोहपुरुष तथा माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची 148 वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. संस्थेतील महिला व युवतींनी राष्ट्रीय एकात्मतेची व भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्याची शपथ घेऊन, एकता दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, लेखापाल अनिल तांदळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी कुंदा शिंदे, प्रशिक्षिका मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे, विजय बर्वे, उषा देठे, प्रशिक्षणार्थी युवती व महिला उपस्थित होत्या.


बाळासाहेब पवार म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य व एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान न विसरता येणार आहे. देशाचे गृहमंत्री असताना अनेक संस्थाने त्यांनी खालसा केली. अस्पृश्‍यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठविला. समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.


नालेगाव परिसरातून काढण्यात आलेल्या एकता दौडमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. तर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. युवतींनी विविध घोषवाक्यासह स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पोस्टर रंगवले. संस्थेच्या कान्हूर पठार, डोंगरवाडी (ता. पारनेर), कोंदणे (ता. कर्जत) येथील शाखेत देखील राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


1 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती ते 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती काळावधीत संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियानासह विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षरोपण, प्लास्टिक मुक्ती, आरोग्य शिबिराचा समावेश होता. महिलांसाठी कौशल्य संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *