नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांसह पालकांनी स्विकारावे -अरुण कुलकर्णी
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षाची पहिली पालक सभा उत्साहात पार पडली. या सभेत मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा घेण्यात आली. कुलकर्णी म्हणाले की, सध्या शैक्षणिक धोरण झपाट्याने बदलत आहे. त्याचा स्विकार करुन पुढे जावे लागणार आहे. सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. शिक्षणाने प्रत्येकात एक आत्मविश्वास निर्माण होतो. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण ही यशाची पहिली पायरी ठरणार असल्याचे सांगून उच्च शिक्षण घेण्याचे त्यांनी सांगितले. तर बदलणारा अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती, अध्यात्म तसेच विद्यार्थ्यांना वाचनाविषयी गोडी कशाप्रकारे निर्माण करावी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. प्रज्ञाताई असनीकर यांनी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना पालकांनी हसत-खेळत शिक्षण कसे द्यावे. विद्यार्थ्यांसाठी घरामध्ये आनंददायी वातावरणात कसे वाढवावे?, मुलांचा आहार, विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कसा करावा? याविषयी पालकांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदीप भोर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रमाची माहिती देऊन विविध स्पर्धा परीक्षा, स्कॉलरक्षिप परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणवत्तेचा आढावा घेतला. यावेळी प्राध्यापक शेळके, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, सर्व शालेय शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्मिता खिलारी यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश साठे यांनी आभार मानले.