प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा महिलांसाठी रंगला उत्साही सोहळा; 20 विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षीस
कोजागिरी पौर्णिमा स्त्रीशक्तीचा आणि कर्तृत्वाचा उत्सव -सुप्रिया जाधव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आनंद, सौंदर्य आणि चांदण्यासारखी स्त्रीशक्ती! याच भावनेला साजेसा असा खेळ पैठणीचा सन्मान नारीशक्तीचा! हा सोहळा प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रुपच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम सावेडी येथील नगरी व्हिलेज हॉटेल येथे घेण्यात आला होता. चांदण्यांनी उजळलेल्या वातावरणात महिलांनी कोजागिरी पौर्णिमेचा आनंद होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात नृत्य, खेळ, हशा आणि मैत्रीच्या रंगात साजरा केला.
या कार्यक्रमात विविध खेळ आणि मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी उखाणे स्पर्धा, रिंग फेकणे, फुगे फोडणे आणि नाव घेणे अशा अनेक मनोरंजनात्मक उपक्रमांत सहभाग घेतला. कार्यक्रमात विविध गटांमधील 20 विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले, तर इतर विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
अंजली वर्मा, सुप्रिया जाधव, अनुजा जाधव आणि श्रुती मनवेलकर यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयासच्या अध्यक्षा रजनी भंडारी, उपाध्यक्ष ज्योती गांधी, राखी आहेर, सचिव उज्वला बोगावात, हिरा शहापुरे, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सल्लागार विद्या बडवे, खजिनदार मेघना मुनोत, छाया राजपूत, राखी जाधव, अरुणा गोयल, मंगला गुंदेचा, डॉ. पद्मजा गरुड, सविता मोरे, शशिकला झरेकर, सुजाता कदम, रोहिणी पवार, रेखा मैड, उषा सोनटक्के, उषा सोनी, विद्या कचरे, सुरेखा जंगम, मीरा बेरड, पूर्वा एरंडे, आरती थोरात, नीलिमा पवार, ज्योत्स्ना कुलकर्णी, आशा कापसे, सविता धामट, मीरा पाटील, शारदा होशिंग, स्वाती गुंदेचा, सुनिता काळे, अलका वाघ, प्रतिभा पेंडसे, आरती वाडेकर, जयश्री पुरोहित, रेखा फिरोदिया, आशा गायकवाड, सुशीला त्र्यंबके, माया फसले, हेमा पडोळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुप्रिया जाधव म्हणाल्या की, कोजागिरी पौर्णिमा ही फक्त सण नाही, तर स्त्रीशक्तीचा आणि कर्तृत्वाचा उत्सव आहे. प्रत्येक महिलेमध्ये एक वेगळी ताकद, एक अद्भुत सर्जनशीलता दडलेली असते. तिने ती ओळखून जोपासावी, वाढवावी आणि आत्मविश्वासाने पुढे जावे. त्यांनी महिलांना स्वतःसाठी वेळ देण्याचे, आनंद शोधण्याचे आणि कौशल्य जोपासण्याच आवाहन केले. श्रुती मनवेलकर यांनी महिलांशी संवाद साधून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी ग्रुपच्या 32 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रयत्नशील महिलांच्या या मंचाच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. यानंतर सुमित वर्मा यांनी आईला समर्पित करणारे भावस्पर्शी गीत तेरे उंगली पकड केले चला… या गीताने वातावरण भावनिक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि खेळ पैठणीचा हा आकर्षक गेम चेतन गायकवाड यांनी हलक्या फुलक्या शैलीत पार पाडला. संपूर्ण कार्यक्रमात महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मैत्रीचा ऊबदार भाव आणि आत्मविश्वासाचे तेज झळकत होता. विविध खेळांच्या माध्यमातून महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सुमित वर्मा यांच्या वतीने महिलांना पैठणीचे साड्यांचे बक्षीस देण्यात आले.