• Mon. Jul 21st, 2025

बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याच्या निर्णयाला विरोध

ByMirror

Jan 6, 2024

अहमदनगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे पुणे बोर्डाच्या अध्यक्षांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांसह पालकांना गोंधळात टाकणारा व गैरसोयीचा ठरणारा दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा प्राथमिक (खाजगी, जिल्हा परिषद) माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक परीक्षा केंद्र आहेत, तेथे विद्यार्थ्यांची आसन व्यवस्थेत बदल करून सरमिसळ करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय रद्द होण्यासाठी समितीच्या वतीने पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिजगर यांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, प्रा. विजय पोकळे, मुख्याध्यापक संघाचे मिथुन डोंगरे, ज्ञानदेव बेरड, भाऊसाहेब रोहकले, सुनील धुमाळ, संभाजी पवार, संजय वरात यांनी निवेदन दिले. यावेळी सचिव औदुंबर उकिर्डे, शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, सहसचिव राऊत आदी उपस्थित होते.


न्यु आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात पुणे विभागीय मंडळातर्फे जिल्ह्यातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांची सहविचार सभा मिजगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने मिजगर यांची भेट घेऊन सदर प्रश्‍नावर लक्ष वेधण्यात आले.


विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा हा निर्णय असून, फक्त पुणे विभागांमध्ये आणि त्यातच फक्त शहरांमध्ये हा बदल करण्याचा घाट पुणे विभागीय मंडळ घेत आहे. या गोष्टीमुळे शहरांमध्ये शहरांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. प्रवेश घेतानाच विद्यार्थी सोयीच्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेत असतो. शिक्षण घेत असताना तो परिसर त्याच्या परिचयाचा झालेला असतो. परंतु यावेळी परीक्षा केंद्रात अपरिचित ठिकाणी परीक्षेला जावे लागल्याच्या कल्पनेने विद्यार्थी व पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या परीक्षेवर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. दूरवरचे केंद्र असल्याने प्रत्येक पालक आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडू शकत नाही. परीक्षा कालावधीत अनेक वेळा लग्नसराई किंवा अन्य तत्सम गर्दी निर्माण होणाऱ्या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण होणार असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


तसेच काही कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर हा मोठा असतो. तेथे एकापेक्षा जास्त इमारतीत बैठक व्यवस्था केलेली असते. बारावी बोर्डाच्या परीक्षेला विषयांची विविधता असल्याने इयत्ता बारावीची बैठक व्यवस्था प्रत्येक पेपरला बदलली जाते. त्यामुळे परीक्षा हॉल सापडणे यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची धावपळ होणार असून, त्याचा मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येणाऱ्याची शक्यता आहे. दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांचा आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते, त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असावा. या निर्णयामुळे ठराविक विद्यार्थ्यांचे केंद्र बदलणार असल्याने यामध्ये भेदभाव निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान देखील होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *