अण्णाभाऊंनी साहित्यातून झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले -अनिल साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव साळवी, सल्लागार ॲड. दीपक धिवर, सदस्य रवी सुरेकर, रवी साखरे आदी उपस्थित होते.
अनिल साळवे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी सामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती संग्राममध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर श्रमिक कष्टकऱ्यांची चळवळ त्यांनी चालवली.
आपल्या साहित्यातून त्यांनी झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले. वंचितांच्या संवेदना मांडून, अन्यायाविरुध्द प्रतिकार करण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यांचे विचार आजही कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य वर्गासाठी प्रेरक असल्याचे त्यांनी सांगितले.
