डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते साळवे व सौ. रत्नमाला साळवे यांनी पुरस्कार स्विकारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नरिमन पॉर्इंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात झालेल्या या शासनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोडिया, आमदार अग्रवाल, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे, समाज कल्याणचे वरिष्ठ लिपीक मधुकर महानोर आदी उपस्थित होते.
सुनील साळवे यांचे रिपाईच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजातील विविध प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी ते योगदान देत आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.