• Thu. Nov 13th, 2025

मराठी साहित्य मंडळाच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

ByMirror

Nov 5, 2025

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल


सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त, मराठी साहित्य मंडळ (ठाणे) यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर मध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डोंगरे यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


स्व. शाहूराव देशमुख साहित्य नगरीत संमेलनाचे उद्घाटक आमदार संग्राम जगताप, संमेलन अध्यक्ष तथा जेष्ठ कादंबरीकार दशरथ यादव, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, स्वागत अध्यक्ष जयद्रथ खाकाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव (बाळासाहेब) देशमुख यांनी दिली.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामस्थांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि तीन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी आयोजन केले होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना मराठी साहित्य मंडळ (ठाणे) यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *