• Fri. Jun 6th, 2025

तणावमुक्त जीवनासाठी निमगाव वाघात आनंद अनुभूती शिबिर उत्साहात

ByMirror

Jun 3, 2025

योग, प्राणायाम, सुदर्शन क्रियेतून तणावमुक्ततेचा मंत्र


ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

नगर (प्रतिनिधी)- तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा आनंद अनुभूती शिबिराद्वारे अनुभव निमगाव वाघा ग्रामस्थांनी घेतला. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने, तसेच स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.


गावातील बिरोबा मंदिराच्या सभा मंडपात पार पडलेल्या या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे व विशाल गावडे यांनी योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. आधुनिक जीवनशैलीत वाढणाऱ्या ताण-तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी साधकांना उपयुक्त अशा तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले.


शिबिराचे उद्घाटन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. समारोपप्रसंगी त्यांनी शिबिरात मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचा सत्कार केला. कार्यक्रमास सौरभ कापसे, सतीश जाधव, दिलीप फलके, रावसाहेब जाधव, डॉ. संदीप जाधव, सुरेखा जाधव, नामदेव भुसारे, बाबा डोंगरे, मयुर काळे, मंदा डोंगरे, मंगल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक तणाव हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशा स्थितीत आनंद अनुभूतीसारखे शिबिर मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे शिबिर म्हणजे एक आनंदी जीवनाचा प्रवास आहे. समाजाला तणावमुक्त व सकारात्मक जीवनशैलीकडे नेणे हीच खरी सेवा आहे. गावकरी बांधवांनी दिलेला प्रतिसाद पाहता यापुढेही असे उपक्रम नियमित राबविण्याचा आमचा त्यांनी व्यक्त केला.


प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे म्हणाले की, आनंद अनुभूती हे शिबिर म्हणजे आत्मशोधाचा प्रवास आहे. योग, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून मनःशांती आणि आनंद मिळतो. शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थांचा उत्साह आणि शिस्त पाहता विशेष आनंद झाला. सततच्या सरावातून मानसिक आरोग्य सुधारू शकते व शरीरात नवचैतन्य निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *