तलाठी, सर्कल व वन अधिकारी यांची चौकशी करून बडतर्फ करा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षतोड करुन हजारो ब्रास अवैध मुरुम उत्खनन नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगावात झाल्याप्रकरणी जबाबदार असणारे तलाठी, सर्कल व वन अधिकारी यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवून पंधरा दिवसात सबंधितांवर कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील गट क्रमांक 596/7 मध्ये वृक्षतोड करुन हजारो ब्रास अवैध मुरुम उत्खनन करण्यात आले आहे. तलाठी, सर्कल व वन अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकरण घडला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. हजारो ब्रास अवैध मुरुम उत्खनन करुन शासनाची फसवणुक करुन महसुल बुडविण्यात आला आहे. तर वृक्षतोड करुन निसर्गाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक हितासाठी संगनमताने हा प्रकार केला आहे. एकीकडे वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य होत असताना, काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे वृक्षतोड झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन, उत्खननाचा पंचनामा करावा व अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.