• Fri. Mar 14th, 2025

बँक कर्मचाऱ्यांचा नवीन करार भविष्यातील हितासाठी -कॉ. देविदास तुळजापूरकर

ByMirror

Mar 22, 2024

अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनची सभा

12 व्या द्विपक्ष कराराची बँक कर्मचाऱ्यांना माहिती देवून शंका व प्रश्‍नांचे निरसन

अहमदनगर (प्रतिनिधी)- बँक कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वेतन वाढमुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे. बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के वेतन वाढ देण्याचा करार मंजूर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील हितासाठी सेवा करारामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्या दृष्टीने बँक कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी केले.


युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन व इंडियन बँक असोसिएशन तर्फे कर्मचाऱ्यांना 17 टक्के वेतन वाढ देण्याचा पंचवार्षिक करार झाला. 12 व्या द्विपक्ष कराराची बँक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रमूख वक्ते कॉ. तुळजापूरकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष कॉ. शिरीष राणे यांची उपस्थिती होती तसेच कॉ. महेश पारखी, कॉ. नरेंद्र जंगम, कॉ. विनोद कदम, कॉ. दिलीप ठोंबरे, कॉ. राजेंद्र देवडे, कॉ. राजेंद्र पोकळे आदी उपस्थित होते.


प्रस्ताविक अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष कॉ. माणिक अडाणे यांनी केले. जनरल सेक्रेटरी कॉ. कांतीलाल वर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कॉ. प्रकाश कोटा यांनी सभेचे उद्देश स्पष्ट केले. कॉ. सुजय नळे यांनी मनोगत व्यक्त करून प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले.


कॉ. शिरीष राणे म्हणाले की, वेतन वाढ करारासाठी बँक कर्मचारी संघटनांना प्रथमच आंदोलनाशिवाय यश आले. हे एकजुटीमुळे शक्य झाले. बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागणी या पंचवार्षिक करारात मान्य झाल्या आहेत. या करारात पाच दिवसांचा आठवडा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे आणि लवकरच केंद्र सरकार त्यास मंजुरी देणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


तर यावेळी 12 व्या द्विपक्ष कराराची माहिती देवून कार्यरत कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांना मिळणारे फायदे, कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील हितावर चर्चा करण्यात आली. तर सर्वांच्या मनातील शंका व प्रश्‍नांचे कॉ. तुळजापूरकर व कॉ. राणे यांनी निरसन केले. भविष्यातील बँक क्षेत्रातील वाटचालीवर खुली चर्चा रंगली होती. याप्रसंगी सर्व बँकेतील कर्मचारी व निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. उमाकांत कुलकर्णी, कॉ. प्रकाश कोटा, कॉ. भरतकुमार गुजराथी, कॉ. सुजय नळे, कॉ. विनायक मेरगु, कॉ. पोपट गोहाड, कॉ. नंदकुमार तांबडे, कॉ. नंदलाल जोशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. प्रकाश कोटा यांनी केले. कॉ. उमाकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *