• Tue. Oct 14th, 2025

निमगाव वाघात स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात

ByMirror

Oct 6, 2025

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने गौरव


कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी मुलींना सक्षम बनवा -तेजश्री थोरात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा सोहळा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.


महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत, समाजातील महिला सक्षमीकरणाचा संदेश यावेळी देण्यात आला. परिवार मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात देवीची प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात व पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सरपंच उज्वला कापसे, संदीप वाबळे, कार्यक्रमाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे आदींसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती साधली असून, विविध क्षेत्रात त्या कर्तृत्व गाजवत आहे. त्यांच्या सन्मानार्थ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बचत गटातील महिलांचा मेळावा पार पडला. महिलांना निंबळकचे प्रभाग समन्वयक संदीप वाबळे व पंचायत समितीच्या रोहिणी आगरकर यांनी मार्गदर्शन केले.


पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे म्हणाल्या की, सोशल मीडियावर अनेक फसवणुकीचे प्रकार घडतात. महिलांनी जागरुक राहून आपले वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना खबरदारी घ्यावी. सोशल मीडियाद्वारे महिलांची फसवणुक मोठ्या प्रमाणात होत असून, सेफ इंटरनेट वापराचा प्रसार महिलांमध्ये करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात म्हणाल्या की, मुलींना सक्षम, सबल बनवा मुलींचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे. मुलींना इतके सक्षम बनवले पाहिजे की, कोणत्याही संकटाला तिला सामोरे जाता यावे. भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा दिला असून, त्याची पूजा व सन्मान करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


सरपंच उज्वला कापसे (सामाजिक व राजकीय क्षेत्र), नगर पंचायत समितीचे कृषी व्यवस्थापक रोहिणी आगरकर (कृषी), सरोज आल्हाट (कवियत्री व साहित्यिक), डॉ. सौ. अस्मिता खिस्ती (वैद्यकिय), मुख्याध्यापिका संगीता फुलसौंदर (शिक्षण), सहकार क्षेत्रात वैशाली वर्पे (सहकार), महसूल सेवक सुनीता जाधव (शासकीय), सोनाली फलके (बचत गट), देवकी ढोकणे (शैक्षणिक), मंगल ठाणगे (बचत गट), पूर्वा ख्रिस्ती (शैक्षणिक) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आगरकर यांनी करुन महिला सक्षमीकरणावर चारोळ्या सादर केल्या. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *