• Mon. Jul 21st, 2025

लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राष्ट्रीय नामध्यान चळवळ

ByMirror

Dec 17, 2023

पीपल्स हेल्पलाईन ओम नमो मातरमच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्नशील

देशाबद्दल लहानांपासून वृद्धांपर्यंत आस्था वाढविणारी मोहिम -ॲड. गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण 80 ते 85 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला देशावर खऱ्या अर्थाने प्रेम करावयास लावण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने राष्ट्रीय नामध्यान चळवळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, परंतु आजही लोकांमध्ये देशाबद्दल खऱ्या अर्थाने आस्था असल्याचे स्पष्ट होत नाही. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने लोक मतदान करण्याचे टाळतात. त्याशिवाय आपली मते मोठ्या संख्येने विकतात किंवा जाती धर्माच्या नावावर मतदान करतात. त्यामुळे व्होटमाफीया मागच्या दाराने सत्ता मिळतात आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा महामेरु देशात टिकून असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


आपल्या देशाबद्दल लहानांपासून वृद्धांपर्यंत आस्था वाढली पाहिजे, त्यासाठी राष्ट्रीय नामध्यान चळवळ सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक भारतीयाने ओम नमो मातरम या नाममंत्रावर ध्यान करण्याचा आग्रह चळवळीच्या वतीने ठेवण्यात येणार आहे. आपला देश म्हणजे मायभूमी, नागरिकांसाठी अधिक पवित्र असून, प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आस्था असली पाहिजे. त्याचबरोबर देश हिताला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. ओम नमो मातरम या ध्यानमंत्रामुळे देशाबद्दल आस्था वाढेल आणि मतदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही. कोणताही मतदार राष्ट्रीय कर्तव्य टाळणार नसल्याची खात्री संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.


जगभरामध्ये मेडिटेशन ही संकल्पना रुजली आहे. जगभरातील लोक आपल्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी याचा वापर करतात. भारतामध्ये नामध्यान ही क्रिया हजारोवर्षे चालत आलेली आहे. अशा नामध्यान क्रियेचा वापर देशाबद्दलचे प्रेम आणि आस्था वाढविण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरणार आहे. नामध्यान क्रिया ही कोणत्याही धर्माचा भाग नसून, एक मानसशास्त्राचा भाग आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यामध्ये वंदे मातरम अशा घोषणा सातत्याने दिल्या होत्या. त्यातूनच स्वातंत्र्य सैनिकांना मोठी प्रेरणा मिळत होती. त्याच प्रकारे ओम नमो मातरम या मंत्रामुळे संपूर्ण देशात चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आई-वडिलांना वंदन करण्याबरोबर देशाला वंदन करणे प्रत्येकाला आवडते. त्याचप्रमाणे या मंत्रामुळे देशातील महापुरुषांना वंदन करता येणार आहे. संपूर्ण देशात आणि विशेषत: नवीन पिढीमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.


शाळांपासून या नामध्यानचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे. यासाठी ॲड. गवळी, शुभम मोरे, बलराम बुगे, सुरेश बोठे, संजय कुमार, शाहीर कान्हू सुंबे, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, डॉ. रमाकांत मडकर, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, वीरबहादूर प्रजापती, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *