बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बावा यांच्या हस्ते सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी विनोद अंबरकर, अलकाताई गायकवाड, नाशिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष राहुल मोरे, सचिव महेश मुळे, वाजिद खान आदी उपस्थित होते.
सोनावणे हे जिल्हा सहकारी बँकेत अनेक वर्षापासून कार्यरत असून, सध्या ते मेहेकरी (ता.नगर) शाखेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व मुंबई, नांदेड, भोपाळ, हैदराबाद येथे बँकेच्या माध्यमातून दिलेल्या सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.