ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 23 पिडीत वेठबिगारांची सुटका करणाऱ्या पोलीस अधिकारींचा सन्मान
माणुसकी जपण्याचे कार्य करणाऱ्या मानवसेवा प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद -राकेश ओला
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून बेघर, निराधार पिडीत मनोरुग्ण, मतिमंद आणि वेठबिगारी व्यक्तींना शोषणापासून मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. माणुसकी जपण्याचे कार्य संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पाद्वारे होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.

राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिनानिमित्त अरणगाव रोड येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक ओला बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिक्षक जीवन, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गाजरे, राज चाटे, संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे, मार्गदर्शक संजय शिंगवी, महेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय शिंगवी म्हणाले की, ज्यांना समाजाने नाकारलं, ठोकरलं, फसवलं, हेटाळलं, नासवलं त्या निराधार पिडीत मानसिक विकलांग आणि मानसिक गुलामगिरीतील वेठबिगारांच्या उसवलेल्या आयुष्यात मायेचा टाका घालायचा आणि त्यांचे आयुष्य बदलून पून्हा माणुस म्हणून समाजात उभं करण्याचे कार्य मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरात बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी धडाकेबाज कामगिरी करीत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 23 पिडीत वेठबिगारांची सुटका करून मानवी तस्करीला आळा घालण्याचे काम केले आहे. यावेळी मानवसेवा प्रकल्पात दाखल जिल्ह्यातील ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पिडीतांचे आणि धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या बेलवंडी पोलीस स्टेशनचे पदोन्नती प्राप्त अमलदारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी केले. आभार संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, सोमनाथ बर्डे, महेश येठेकर, सुशांत गायकवाड, राहुल साबळे यांनी परिश्रम घेतले.