अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल वाशी (मुंबई) येथील इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन, अमरदीप बालविकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.

त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. वाशी (मुंबई) येथे पाहुण्यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजरी फाऊंडेशनचे ईसा शेख, जय असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ह.भ.प. ॲड. सुनील महाराज तोडकर, काँग्रेसच्या सहसमन्वयक मंगलताई भुजबळ, भारतीय लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब काळे, जय असोसिएशनचे पोपट बनकर, संतोष गिऱ्हे आदींसह वाळकी ग्रामस्थ व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भालसिंग यांचे अभिनंदन केले आहे.
