शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल
प्रतिकूल परिस्थितीतून घडलेले शिक्षक गरजू विद्यार्थ्यांसाठी ठरले आधारवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील शालेय शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल साऊ ज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘साऊ ज्योती सामाजिक संस्था’ यांच्या वतीने त्यांना ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला आहे.
16 नोव्हेंबर रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज भोसले, प्रा. डॉ. शंकर अंदानी, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, मराठी सिने अभिनेत्री मृणाली कुलकर्णी, कवियत्री वैशाली शेलार, मराठी सिने अभिनेते युवराज कुमार यांच्या उपस्थितीत आभाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे व उपाध्यक्ष विकास उबाळे यांनी दिली.
परिस्थिती कठीण असली तरी शिक्षणाची वाट निवडल्यास यश निश्चित आहे,” हे वाक्य खरे ठरवत भगवती माता विद्यालय, नांदूर खंदरमाळ (ता. संगमनेर) येथील शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांनी आपल्या कार्यातून शिक्षण आणि समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. आभाळे यांचे मूळ गाव अकलापूर असून त्यांनी बालवयातच पितृछत्र हरपले. आई आणि काकांच्या सहकार्याने त्यांनी शिक्षणाची वाट चालू ठेवली. कठीण परिस्थिती असूनही शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज ते शाळेत विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर संस्कार, आत्मविश्वास आणि समाजभान रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
अनेक गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन ते शिक्षणात हातभार लावत आहेत. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. शिक्षणाबरोबरच आभाळे हे सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. ग्रामीण भागातील युवकांमध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण करणे, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि रक्तदान शिबिर यांसारख्या उपक्रमांत त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
