आयुर्वेद तज्ञांचा गौरव
आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे निरोगी लोकांच्या आरोग्याचे रक्षण -डॉ. संजय पुंड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर व अजय मेडिकलच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला.
यावेळी आयुर्वेद क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट प्रतिनिधी व गेली 25 वर्षे अध्ययन करणारे गुणे आयुर्वेद हॉस्पिटलचे आयुर्वेद तज्ञ डॉ. संजय पुंड, आयुर्वेदिक एजन्सीचे संचालक व गेली 50 वर्षे योगदान देणारे अशोक शर्मा, केमिस्ट संघटना व जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष अनिल गांधी (40 वर्षांची सेवा), महाराष्ट्र आयुर्वेद संघटनेचे संचालक सुधाकर बोरुडे तसेच कनक आयुर्वेदिक एजन्सीचे भोंजाळ यांचा जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे व सचिव अमित मुनोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. संजय पुंड म्हणाले की, आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट निरोगी लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाने दिलेला महत्वाचा मंत्र म्हणजे भुकेनुसार खा. आयुर्वेद उपचाराचे अजून एक बलस्थान म्हणजे पंचकर्म. शरीरात वाढलेले दोष शरीरातून शास्त्रशुद्ध पद्धतीने बाहेर काढण्याची ही अनोखी पद्धत आहे. आज धावपळीच्या जीवनशैलीत, हवामानातील अनपेक्षित बदल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव यामुळे अनेक नवीन आजार उद्भवू लागले आहेत. अशा वेळी जगासाठी आयुर्वेद ही भारताची अमूल्य देणगी असल्याचे ते म्हणाले.
संजय गुगळे म्हणाले की, जायंट्स सप्ताह हा केवळ उत्सव नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. आयुर्वेद हा केवळ आजारांवर उपचार करणारा शास्त्र नसून निरोगी राहण्यासाठी जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन करणारी प्राचीन पध्दत आहे. आयुर्वेदाच्या मदतीने प्रत्येक घरात निरोगी कुटुंब घडणार असल्याचे ते म्हणाले.
या आठवड्यात विविध सामाजिक उपक्रम घेऊन जायंट्स सप्ताह साजरा करण्यात आला. त्यात रक्तदान शिबिर, जनावरांच्या आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, महानुभाव आश्रम येथे अन्नदान, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास रक्तदाब मोजण्याचे मॉनिटर प्रदान व गुटखा, तंबाखू, सिगारेटच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी पोस्टरचे विमोचन करण्यात आले.