• Fri. Sep 19th, 2025

आरक्षणासाठी नंदीवाले तिरमली समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

ByMirror

Sep 18, 2025

मायबाप सरकार आरक्षण मिळेल का? गुबूगुबू…..; नंदीबैलांनी सरकारला वाकून घातला नमस्कार


राहायला घर नाही, शेती नाही, रोजगार नाही…तिरमली समाजाचा आक्रोश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहण्यासाठी जागा नाही…, शेती नाही…, मुलांना उच्च शिक्षण दिले, पण नोकरी नाही…, रोजगार नाही…, हाताला काम नाही… अशा हृदयस्पर्शी व्यथा मांडत नंदीवाले तिरमली समाजाने गुरुवारी (दि.18 सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.


नंदी बैलांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडकलेल्या समाज बांधवांनी घोषणाबाजी करत सरकारकडे आरक्षणाची मागणी केली. आंदोलनातील नंदीबैलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत शिरून सरकार व अधिकाऱ्यांसमोर वाकून नमस्कार घातला, हा अनोख्या प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधले.


मोर्चाला प्रारंभ जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाला. यानंतर नगर-संभाजीनगर महामार्गावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पुढे महापालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


या मोर्चाचे नेतृत्व नंदीवाले तिरमली समाजाचे सुभाष काकडे यांनी केले. या वेळी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाळू विशे, संस्थापक अध्यक्ष प्रवीण कानवडे, उपाध्यक्ष प्रदीप औटी, अजय शेळके, विनोद साळवे, योगेश खेंडके, महेश काळे, अजित शिंदे, बाबुराव फुलमाळी, भीमा औटी, विष्णू पवार, गणेश गुंडाळे, उत्तम फुलमाळी, भानुदास फुलमाळी, दीपक औटी, रावसाहेब फुलमाळी, सुरेश औटी, रामा आव्हाड, लिंबाजी देशमुख, अण्णा फुलमाळी, आदिनाथ ओनारसे, बाळू औटी, गुलाब काकडे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.


महाराष्ट्रातील तिरमली नंदीवाले समाजास हैदराबाद, सातारा गॅझेटनुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366 (खंड 25) व अनुच्छेद 342 नुसार अनुसूचित जमाती किंवा आदिम जमातीचा दर्जा प्राप्त आहे. राष्ट्रपतींना अनुसूचित जमाती विनिर्दिष्ट करण्याचा अधिकार असून 1950 मध्ये पहिला आदेश काढण्यात आला. पुढे 1956 व 1960 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली.


दि. 27 जुलै 1977 पासून अनुसूचित जाती-जमाती आदेश (सुधारणा) अधिनियम 1976 अस्तित्वात आला. या अधिनियमानुसार क्षेत्र बंधन दूर झाल्यामुळे तिरमली नंदीवाले समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात आजतागायत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष असून तातडीने हा प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे करण्यात आली.


मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व युवकांनी राहण्यासाठी घर नाही, शेती नाही, मुलांना शिक्षण दिले पण रोजगार नाही, नोकरी नाही… आमच्या समाजाला आरक्षण मिळणार की नाही? शासनाला थेट प्रश्‍न विचारला. शासनाने या प्रश्‍नाचे तातडीने उत्तर द्यावे व आरक्षण जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *