• Thu. Oct 16th, 2025

शहरात मुस्लिम बांधवांची पावसासाठी नमाज अदा

ByMirror

Sep 3, 2023

नमाज इस्तिस्काचे पठण, अल्लाहकडे प्रार्थना

या अल्लाह तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे!

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असताना दुष्काळाचे नैसर्गिक संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस पडावा म्हणून शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी रविवारी (दि.3 सप्टेंबर) कोठला येथील ईदगाह मैदानमध्ये नमाज इस्तिस्काचे पठण केले. या नमाजसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे पावसासाठी दुवा केली.


सकाळी 10:30 वाजता मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज इस्तिस्काचे पठण करण्यात आले. तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे पिके करपू लागली आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. एकंदरीत राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असून, हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून मुस्लिम समाज बांधवांनी नमाज पठण केली.


संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली. या विशेष नमाजमध्ये हाताचे पंजे उलटे ठेवून झालेल्या चूका (गुन्हा) बद्दल क्षमा मागून पावसासाठी अल्लाहकडे दुवा मागण्यात आली.

दुवा मागताना अनेकांचे डोळे पाणावले. या अल्लाह तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे!, तुझ्याकडे दयेची भीक मागतो, या नैसर्गिक संकटातून आम्हाला वाचव, मोहम्मद पैगंबरांनी जो सत्यमार्ग दाखविला, त्या मार्गावर चालण्याची सर्वांना सद्बुध्दी दे, तू या संकटातून सुटका करु शकतोस, भरपूर पाऊस पडू दे, अशी दुवा यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *