माहुर येथील मेळाव्यात पुरस्काराचे झाले वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जिल्हा शाखेचा यंदाचा पुरस्कार नगर दक्षिण व नगर उत्तर जिल्ह्याला मिळाला आहे. माहुर (जि. नांदेड) येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष मेळाव्यात पुरस्कार वितरण करण्यात आले. अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके व अहमदनगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष अमौल वैद्य यांनी हा पुरस्कार स्कािकारला.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा नुकतेच नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिजीटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी, अनिकेत तिडके यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेकडून ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने अहमदनगर दक्षिण व उत्तर जिल्ह्याच्या वतीने सूर्यकांत नेटके व अमोल वैद्य यांचा गौरव केला. यावेळी नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीवर नियुक्ती झाल्याने विजयसिंह होलम यांचाही यावेळी परिषदेकडून विशेष गौरव करण्यात आला. तसेच माजलगाव (जि. बीड), माहूर (जि. नांदेड), साक्री (जि. धुळे), शिरूर (जि. पुणे), तेल्हारा (जि. अकोला), बत्तीस शिराळा (जि. सांगली), आर्वी (जि. वर्धा) व अंबरनाथ (जि. ठाणे) या तालुक्याचा वसंतराव काणे उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरव करण्यात आला.