भारतातील सर्व शाळांमध्ये डॉ. कल्पना घडेकर यांचे अबॅकस संशोधन शिकवले जावे -अंजना पवार
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशांमध्ये लागू झाले असून यांमधून मोठी शैक्षणिक क्रांती घडणार आहे.यासाठी शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत.नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक संकल्पनांना आता महत्त्व येणार आहे.अशा परिस्थितीत पारंपारिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाच्या अबॅकस सारख्या संकल्पना आता महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारतातील सर्व शाळांमध्ये डॉ.कल्पना घडेकर यांचे अबॅकस संशोधन शिकवले जावे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षा अंजना पवार यांनी केले.
येथील रक्षिता महिला मंचच्या संस्थापिका सौ.कल्पना अशोक घडेकर- कार्ले यांना भारत सरकारच्या नीती आयोग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय तसेच सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय, तसेच आयर्लंड ॲक्रेडेशन फोरमच्या वतीने प्रमाणित लिजेंड्री पीस अवॉर्ड कौन्सिल या शैक्षणिक विद्यापीठाची अबॅकस या गणितीय संकल्पनेतील मोजणीमधील हातच्याची अडचण सोडवणाऱ्या क्रांतीकारी संशोधनाबद्दल केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली पीएचडी प्रदान करताना अंजना पवार बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिहारचे खासदार सुरज मंडल, संगीतकार ब्रह्मपाल नागर, अभिनेत्री पायल सरकार व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिष्यवृत्ती, राष्ट्रीय ओळखपत्र, पीएचडी सनद, गौरवचिन्ह, पीएचडी पदक, सॅश-सन्मान वस्त्र आदी या पदविकेचे स्वरूप असून नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे संपन्न झालेल्या या शानदार समारंभात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील शिक्षण तज्ञ उपस्थित होते. यावेळी डॉ. घडेकर यांनी पीएचडीच्या मुख्य विषयाचे अबॅकस मण्यांची पाटी, अबॅकस वरील स्वलिखित/ प्रकाशित वैशिष्ट्यपूर्ण 50 पुस्तकांचे प्रदर्शन,वैदिक गणिताची संकल्पना पीपीटी प्रेझेंटेशनसह सादरीकरण केले. सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवर व विषय तज्ञ यांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरसन केले.