• Sat. Mar 15th, 2025

ईपीएस 95 पेन्शनर्सच्या दिल्ली येथील देशव्यापीआंदोलनास महाराष्ट्रातील खासदारांनी दिला पाठिंबा

ByMirror

Aug 4, 2024

केंद्र सरकारच्या प्रतिनिधीबरोबर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा -सुभाषराव पोखरकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सच्या पेन्शन वाढसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन करण्यात आले. ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने पेन्शन संबंधी प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी धरणे आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनास महाराष्ट्रातील 10 विरोधी खासदारांनी भेट देऊन दिला पाठिंबा दिला. तर केंद्र सरकारच्या प्रतिनिधीबरोबर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती पश्‍चिम भारत क्षेत्र संघटक सुभाषराव पोखरकर यांनी दिली.


जुलै महिन्यात देशभरात विविध राज्यात दिल्ली येथील आंदोलनाबाबत पेन्शनर जागरण सभा व मेळावे घेण्यात आले होते. महाराष्ट्रात या संबंधी जनजागरण मोहिम हाती घेऊन कमांडर अशोक राऊत यांनी 12 जुलै ते 20 जुलै या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व नांदेड येथे प्रादेशिक मेळावे व नाशिक ,नगर धुळे इ.जागरण सभा घेतल्याने महाराष्ट्रातून ईपीएस 95 पेन्शनर्सचा मोठा जनसमुदाय या आंदोलनात उतरला होता. या आंदोलनास विविध प्रांतातील खासदारांनी पाठिंबा देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. यामध्ये महाराष्ट्रातून खासदार संजय देशमुख (यवतमाळ, उबाठा), नागेश आष्टीकर (हिंगोली, उबाठा), संजय उर्फ बंडू जाधव (परभणी, उबाठा), डॉ. सौ. शोभाताई बच्छाव (धुळे, कॉग्रेस), राजाभाऊ वाजे (नाशिक, उबाठा), भास्करराव भगरे सर(दिंडोरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी उबाठा), ओमराजे उर्फ पवनराजे निंबाळकर (धाराशिव, उबाठा), कल्याणराव काळे (जालना, कॉग्रेस), छत्रपती श्रीमंत शाहू महाराज (कोल्हापूर, काँग्रेस) यांनी आंदोलनात उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला.


संघटनेच्या वतीने खासदारांचे स्वागत संघटनेचे राष्ट्रीय महासचिव इंजि. विरेंद्र सिंह राजावत यांनी केले. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी यावेळी ईपीएस 95 पेन्शनर्सचे प्रश्‍न मांडून, सरकार व ईपीएफओच्या क्रुर व अमानवीय अत्याचारी नितीचा निषेध व्यक्त केला. तर पेन्शनर्सनी आपली नाराजी लोकसभेच्या निवडणुकीत सरकार व सरकारच्या नितीचा विरोध करीत व्यक्त केली आहे. सरकारने आमचा प्रश्‍न जर या महिन्याभरात सोडविला नाही, तर महाराष्ट्र, हरियाणा, छत्तीसगड राज्यासह उत्तर प्रदेश व इतरही राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पेन्शनर्स मतदार सरकारच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचा इशारा दिला.


जंतर-मंतर वर आंदोलन सुरू झाल्यानंतर तातडीने केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त यांनी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊत यांना दुपारी चर्चेसाठी निमंत्रित केले, त्यावर कमांडर यांनी आमच्या आंदोलनास्थळी खासदार भेटीसाठी येत असल्याने आंदोलन संपल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या प्रतिनिधींसह भेटण्यासाठी आम्ही येवू, असे सांगितले. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर देखील पीएफ कार्यालयाचे अधिकारी थांबून होते. संध्याकाळी उशीरा प्रतिनिधी मंडळा सोबत श्रीमती अपराजिता जग्गी, शुभ्र अग्रवाल या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा संपन्न झाली. त्यात पंतप्रधान व श्रममंत्री पेन्शन प्रश्‍न सोडविण्यासाठी संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले.


आंदोलनात जे खासदार सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी खासदार धैर्यशीलराव माने यांनी महाराष्ट्रातील खासदारांची विशेष बैठक 1 ऑगस्ट रोजी सकाळी बोलाविली, परंतु संसदेचे कामकाज रात्री उशिरापर्यंत चालले म्हणून सकाळी 12 खासदार एकत्र आले. यावेळी राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रतिनिधी मंडळ हजर होते. या आंदोलनातून केंद्र सरकारकडे ईपीएस 95 पेन्शनर्सच्या तीव्र भावना पोहचविण्यात संघटनेला यश आले असून, लवकरच सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा कमांडर राऊत यांनी व्यक्त केली आहे.

या आंदोलनात राष्ट्रीय सल्लागार डॉ.पी.एन. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष के.एस. तिवारी (लखनौ), पुरण सिंग (मथुरा), राष्ट्रीय समन्वयक रमाकांत नरगुंड (बंगलोर), संघटक सुरेश डंगवाल (उत्तर भारत क्षेत्र), उत्तर भारत सचिव रमेश बहुगुणा (दिल्ली), पश्‍चिम भारत क्षेत्र संघटक सुभाषराव पोखरकर (अहमदनगर), तपन दत्ता (कलकत्ता), विजय भटनागर (लखनौ), महाराष्ट्र अध्यक्ष आंबेकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव, पुणे समन्वयक अजीत घाडगे,अहमदनगर जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर पिंपरी चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत आदींसह सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि देशभरातील 27 राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी व ईपीएस पेन्शनर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्यातून महिला जिल्हाध्यक्षा आशाताई शिंदे, नेवासा अध्यक्ष बापूराव बहिरट, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा, त्र्यंबकराव देशमुख, साहेबराव वाघ, जालिंदर शेलार, सुरेश कटारिया, बबनराव शेटे, सुलेमान शेख, विनायक लोळगे विठ्ठल गागरे, यांच्यासह 90 पेन्शनरांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *