• Mon. Jul 21st, 2025

ईव्हीएम विरोधात शहरात मोटारसायकल रॅली

ByMirror

Jan 16, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा; सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी

ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात मोटारसायकल रॅलीने मंगळवारी (दि.16 जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.


जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ईव्हीएम मशीन विरोधात मोटारसायकल रॅलीचे प्रारंभ झाले. यावेळी आंदोलकांनी ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, उत्तर जिल्हाध्यक्ष संजय संसारे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, प्रकाश लोंढे, मूलनिवासी ट्रेड युनियन जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, दत्ता वामन, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पवार, आम आदमी पार्टीचे रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे संजय कांबळे, सैनिक समाज पार्टीचे ॲड. तुकाराम डफळ, विक्रम क्षीरसगर, रामदास धीवर, रमेश सूर्यनारायण, माधव देठे, अतुल आखाडे, गणेश चव्हाण, सुरेश चव्हाण, शाहीर कान्हू सुंभे, विनोद साळवे, सोमनाथ गव्हाणे, इंजि. संजय शिंदे, रिपाईचे बंडू आव्हाड, राहुरी येथील डॉ. रमेश गायकवाड, अब्दुल आत्तार, विश्‍वास जगधने, अक्षय दिवे, अजय रोकडे, आकाश साठे, सुदर्शन मोरे, युवराज पारडे, रवींद्र पवार, विजय आढांगळे, प्रकाश ओहोळ, फिरोज शेख, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सागर साळवे, नवीन साळवे, गणेश पवार, अमोल भालेराव, मच्छिंद्र पवार, विजय पवार, अमर सातुरे, सुनील गिऱ्हे, इमरान सय्यद, मन्सूर पठाण, नेवासा येथील गणपत मोरे, ज्ञानदेव झिंजुर्डे, कोपरगावचे धनराज चंडाले, राहाताचे किरण वाघमारे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


वाडियापार्क येथील महात्मा गांधी, माळीवाडा येथील महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील प्रमुख चौकातून या मोटारसायकल रॅलीचे मार्गक्रमण झाले. शेवटी मोटारसायकल रॅलीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ईव्हीएम विरोधात निदर्शने करुन सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.


भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील 567 जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तर 31 जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.


निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपीएटी मशीन मधील चिठ्ठ्यांची केवळ 1टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही. दोन्हींची शंभर टक्के तुलना होणे आवश्‍यक आहे. निवडणुकी काळात झालेल्या घोटाळ्यामुळे ईव्हीएम मशीन वरील जनतेचा विश्‍वास संपत चालला आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीन वर अविश्‍वास दाखवलेला आहे. ईव्हीएम विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोग असंवेदनशीलता दाखवून दखल घेत नाही. नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर ईव्हीएम मशीनद्वारे पहिले दहा वर्ष सत्ता काँग्रेसने पचवली व पुढील दहा वर्षे सत्ता भाजप उपभोगत आहे. मतांची चोरी ईव्हीएमद्वारे होत असून, निवडणुक आयोग देखील सत्ताधाऱ्यांना साथ देत आहे. या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशीकडे सुरु असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *