बचत गटाच्या गृह उद्योगातून उभारला व्यवसाय
अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या गृह उद्योग व्यवसायातून आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मिरा बाळासाहेब बेरड यांना नुकतेच कर्तृत्ववान नारी शक्तीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उमेद अभियानातंर्गत बेरड यांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून यशस्वीपणे स्वत:चा व्यवसाय उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला असून, त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
शेंडी बायपास (ता. नगर) येथे नुकतेच पार पडलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व सांस्कृतिक महोत्सवात बेरड यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मिरा बेरड या दरेवाडी (ता. नगर) येथे स्वामी समर्थ स्वयंसहायता समूह गृह उद्योग चालवितात. गृह उद्योगातून त्यांनी अमृत फूड्स ब्रॅण्ड निर्माण केला असून, त्याच्या त्या संचालिका आहेत.
गेल्या पाच वर्षापासून गृह उद्योगाच्या माध्यमातून त्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. त्यांचे आवळा, चटणी, लोणचे, आवळा गुलाबजाम आदी विविध घरगुती उत्पादनांना महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मागणी आहे. त्या आपल्या उद्योगाबरोबरच इतर गृह उद्योग चालविणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देत आहेत.
उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाखाली बेरड यांच्या गृह उद्योगाला चालना मिळाली आहे. त्यांच्या बचत गटाला उमेदच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देवून, महिलांना पॅकिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंगचे ज्ञान दिले जात आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
