पी.ए. इनामदार शाळेत हेड गर्ल व हेड बॉयची निवड
शिक्षण पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भिडणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण हा जीवनाचा पाया असून, हा पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भिडणार आहे. शिक्षणाबरोबर खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज असून, खेळाने मुलांचा शारीरिक विकास होऊन त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती वृध्दींगत होते. करिअर म्हणजे फक्त शिक्षण नसून, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाल्या आहेत. मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षासाठी हेड गर्ल व हेड बॉयची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, महासचिव अब्दुल रऊफ खोकर, संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, इंजि. इकबाल शेख, विकार काझी, शब्बीर अहमद, प्राचार्य फिरोज अली आदीसह पालक उपस्थित होते.

साहेबान जहागीरदार म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांमधील कौशल्य ओळखले पाहिजे. प्रत्येक क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले असून, आपले मुले घडविताना योग्य विचार करुन वाटचाल करावी. मुलांचे ध्येय अगोदरच स्पष्ट असल्यास ते ध्येय सहज गाठले जाऊ शकतात. ध्येय नसलेले विद्यार्थी दिशा भरकटणार असून, पालक व शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना ध्येयाकडे घेऊन जाण्याचे कार्य करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अब्दुल रऊफ खोकर म्हणाले की, दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य फिरोज अली यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. अब्दुल रहीम खोकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेच्या हेड गर्ल पदी जेबा समीर शेख, असिस्टंट हेड गर्ल पदी माहिनूर आदिल शेख व हेड बॉय पदी यासीन अन्सार शेख, असिस्टंट हेड बॉय पदी जुनेद युनूस शेख या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांनी शपथ दिली. तर उपस्थितांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख यांनी केले. आभार अब्दुल रऊफ खोकर यांनी मानले.