विकासाची उंच भरारी ही फक्त शिक्षणामुळेच शक्य -सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटी मधील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या संस्थेच्या सर्व विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेचे माजी प्रमुख कार्यवाहक स्वर्गीय अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील डॉ. मोने कला मंदिर येथे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात द्वीपप्रज्वलनाने झाली. उपस्थितांचे स्वागत ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया प्रास्ताविकात म्हणाल्या की, स्वर्गीय अशोकभाऊ फिरोदिया यांनी काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध योजना राबविल्या. तोच गुणवत्तेचा वारसा संस्थेच्या माध्यमातून पुढे सुरु आहे. संस्थेच्या सर्व शाळांमधून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते व्हावे म्हणून, हा सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगून, सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तर संस्थेच्या नवीन योजनांची व विविध शाळांच्या उत्कृष्ट निकालाची माहिती दिली. रूपीबाई बोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, शैक्षणिक प्रगतीशिवाय जीवनात कोणतीच प्रगती शक्य नाही. विकासाची उंच भरारी ही फक्त शिक्षणामुळेच मिळते. स्पर्धेच्या युगात अवांतर वाचनावर विद्यार्थ्यानी भर द्यावा व मोबाइलचा वापर कमीत कमी करण्याचे त्यांनी आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशासन कायम सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. तर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, अहमदनगर एज्युकेशन संस्था ही महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था असून, संस्थेतील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा कायम उमटवित असतात. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभासक्रमा सोबतच कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यासाठी संस्थेतील शिक्षकाकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत असते. विविध स्पर्धा परीक्षांच्या निययोजन करण्यासाठी या संस्थेचे नेहमीच सहकार्य मिळत असते. विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी व्यावसायिक शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल, असे ते म्हणाले. यावेळी संस्थेतील कला अध्यापक सचिन घोडे यांनी भाऊसाहेब फिरोदिया यांचे नवीन व्यक्तिचित्र तयार केल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आयर्न वुमन प्राची पवार यांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पवार म्हणाल्या की, अहमदनगर एज्युकेशन संस्था ही महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था आहे. ही संस्था 135 वर्षापासून अतिशय कार्यक्षमतेने व यशस्वीपणे मार्गक्रमण करत असल्याबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी फक्त पदवी न मिळवता आपल्या आवडीच्या क्षेत्रात जीवन जगण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या सर्व शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या व अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा,सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त मंडळाचे सदस्या सुनंदाताई भालेराव, ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाच्या सदस्या आशाताई फिरोदिया, पुष्पाताई फिरोदिया, अजय मुथा, हेमंत मुथा, संजय बोरा, मंगलाताई कुलकर्णी, शैलेश मुनोत, भूषण भंडारी, मीना बोरा, कलीम मर्चट, ॲड. किशोर देशपांडे तसेच संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर व आशा सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय कानडे व अंजली गोले यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.