जीवन संपले तरी शरीराने इतरांना उपयोगी पडावे, हीच खरी समाजसेवा -बाबासाहेब शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तसेच अँटी रॅगिंग फोर्सचे प्रमुख बाबासाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मरणोत्तर नेत्रदान, अवयवदान व देहदान संकल्पाने साजरी करण्यात आली.
जयंती निमित्ताने शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून संकल्प अर्ज भरून अधिकृतपणे देहदानाचा निर्णय घेतला. त्याचवेळी रतिलाल भंडारी व ज्योती भंडारी यांनीही संकल्प अर्ज भरले. हा उपक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेत्र विभागाचे समुपदेशक सतिष आहिरे यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांच्या प्रेरणेने राबविण्यात आला. या प्रसंगी उपस्थित अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिंदे व भंडारी दांपत्यांना अवयवदान प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
बाबासाहेब शिंदे म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजासाठी काहीतरी देणे लागते या भावनेने मरणोत्तर नेत्रदान, अवयवदान व देहदानाचा संकल्प केला. जीवन संपले तरी शरीराने इतरांना उपयोगी पडावे, हीच खरी समाजसेवा आहे. मृत्यूनंतर देह जळतो किंवा पुरला जातो, पण जर त्यातून एखाद्या व्यक्तीला नवीन दृष्टी, नवीन श्वास आणि नवजीवन मिळाले, तर त्या आत्म्याला खरी शांती मिळत असल्याचे ते म्हणाले.
सुनिल सकट म्हणाले की, बाबासाहेब शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ वैयक्तिक नव्हे तर समाजासाठी प्रेरणादायी आहे. देहदान, नेत्रदान, अवयवदान हे विषय अजूनही समाजात मर्यादित प्रमाणात चर्चिले जातात. पण अशा उदाहरणांमुळे लोकांचा दृष्टीकोन बदलतो. शासनाने अवयवदान प्रोत्साहनासाठी अनेक मोहिमा राबवल्या आहेत, पण त्या यशस्वी होण्यासाठी समाजातील सक्रिय कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक आवश्यक आहेत. आपण जन्माला येतो तेव्हा काहीच आपल्या सोबत आणत नाही, आणि जातानाही काही नेत नाही; मग देहदान करून कोणाच्या तरी जीवनात प्रकाश निर्माण करणे, हाच मानवतेचा खरा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दत्ता विघावे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
