खासदार निलेश लंके प्रचारात सक्रीय
धनशक्ती व दडपशाहीविरोधात जनशक्तीचा विजय निश्चित- खासदार निलेश लंके
अहिल्यानगर- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा केडगाव परिसरात ढोल-ताशांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला. केडगाव येथील रेणुका माता मंदिरात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रभाग क्रमांक 17 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार कांबळे सिद्धांत संजय (अ) व भाले अलका बालकृष्ण (ब), तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार जाधव आशा किशोर (क) यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
प्रचार रॅलीदरम्यान उमेदवारांसह खासदार निलेश लंके, शिवसेनेचे शहराध्यक्ष किरण काळे, शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र दळवी, प्रतीक भाले, राव नांगरे, संजय कांबळे आदींनी घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. उपनगरातील नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचारात कार्यकर्ते, समर्थक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खासदार निलेश लंके म्हणाले की, ही निवडणूक धनशक्ती व दडपशाही विरोधात जनशक्तीची आहे. सर्वसामान्य उमेदवारांवर दहशत केली जात आहे. पुन्हा एकदा भयमुक्तीसाठी नागरिकांनी निवडणुक हातात घेऊन चांगल्या उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, जनतेशी थेट नाते असणारे उमेदवार महाविकास आघाडीने दिले आहेत. धनदांडग्यांपेक्षा आपल्यातला, आपल्यासाठी धावून येणारा माणूस जनतेला हवा असतो आणि असेच उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर उभे असून, त्यांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.
