शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शिक्षिका विद्या रामभाऊ भडके यांना मुंबईत गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक महेश पालकर, राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.
लेखिका तथा कवियत्री असलेल्या विद्या भडके या नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवाशी असून, श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. साहित्य क्षेत्रात सातत्याने करीत असलेले उत्कृष्ट लिखाण आणि त्याचबरोबर कवितासंग्रह, कथालेखन यांच्या माध्यमातून सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्याचे काम त्या करत आहे. विद्यादान करीत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. विविध क्षेत्रात त्यांचे माजी विद्यार्थी कार्यरत आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्य विद्यार्थी शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात जिल्हा, विभागीय तसेच राज्य पातळीवर यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
भडके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश मुळे, श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक मोरे, पर्यवेक्षक सुनील साबळे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच भाऊसाहेब पानमळकर, रयत प्रतिष्ठानचे पोपट बनकर, प्रा. सिताराम जाधव, अनिल धाडगे, संजय भडके, ॲड. महेश शिंदे, भाऊसाहेब कासार, आश्विनी विधाते, स्वाती बनकर आदींसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.