जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने स्थानिक नवउद्योजकांसह कुशल युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नवउद्योजक आणि नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक कौशल्ये व मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने बुधवारी (दि.29 नोव्हेंबर) महा 60 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पदवीधर युवा, महिला, कुशल तरूण-तरूणी, नव उद्योजक, स्टार्टअप्स, इनक्युबेटर्स, नुकतेच पदवीधर झालेले विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन उद्योग सहसंचालक (नाशिक) तथा जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी केले आहे.
ही कार्यशाळा बुधवारी सकाळी 10 ते दुपारे 2 वाजेच्या दरम्यान नगर-पुणे महामार्गावरील सीएसआरडी महाविद्यालयात होणार आहे. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण 2019 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने कॉर्नेल विद्यापिठाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्हास्तरावर या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून नवउद्योजक व नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करून पूरक वातावरण निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत.
शासनाच्या 6 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे बिझनेस ॲक्सेलेटर प्रोग्राम/इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ इथाका, न्युयॉर्क, युएसए व एक्सईडी (कॉर्नोलचे आशियाई भागीदार) यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र शाासनाने कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने महा-60 कार्यक्रम सुरू केला असून यात दरवर्षी किमान 60 यशस्वी नवउद्योजकांना प्रशिक्षित केले जात आहे.
या कार्यशाळेत कार्यक्रमाचे सादरीकरण, कॉर्नेल महा-60 प्रशिक्षणार्थ्यांचे अनुभव कथन व मार्गदर्शन यासह उद्योग विभागाच्या योजनांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. आयडीबीआय मार्फत आयडीबीआय सीड फंड याचप्रमाणे सिडबी मार्फत स्टार्टअप फायनान्स स्किम चे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवर तज्ज्ञ, एमएसएमई बाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी दिली आहे.
