छत्रपती शिवराचे विचार येणाऱ्या पीढी मध्ये रुजले पाहिजे -प्रा. प्रसाद जमदाडे
शिवरायांबरोबर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी
नगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. हातात भगवे ध्वज तसेच शिवकालीन वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मिरवणुकीतील शिवाजी महाराजांची पालखी आणि तब्ब्ल 51 विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिवकालीन वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, लक्ष्मीबाई राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, संत तुकाराम या महापुरुषांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते.
प्रसाद जमदाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणत कार्यक्रमाची शाळेत सुरुवात केली. ते म्हणाले की, आजची जयंती सर्व चिमुकल्यासाठी प्रेरणा देणारी आहे. शिवरायांचे विचार घरात फोटो लावून किंवा घोषणा देऊन आत्मसात होणार नसून, त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवराचे विचार येणाऱ्या पीढी मध्ये रुजले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. शाळेपासून बँक कॉलनी ते शाहूनगर बस स्टॉप व नंतर पुन्हा शाळेत मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव संदीप भोर, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे, शाळेच्या प्राचार्या रुचिता जमदाडे, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, जयश्री साठे, प्रतिभा साबळे, सपना साबळे, गोंदके, साबळे मावशी, विठ्ठल नगरे, शिवम ठोंबरे, आदेश पवार, कृष्णा कातखडे, अथर्व चंदन आदी सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.