• Thu. Apr 24th, 2025

शिवसेना व जन जागृती मित्र मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

ByMirror

Mar 19, 2025

स्वास्तिक चौकातील 20 फुटी भव्य राजवाड्याची प्रतिकृती व महाराजांच्या पुतळ्याने वेधले लक्ष

शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजात कार्यरत -शिलाताई शिंदे

नगर (प्रतिनिधी)- स्वास्तिक चौक येथे शिवसेना व जन जागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौकात स्टेजवर 20 फुटी भव्य राजवाड्याची प्रतिकृती साकारुन पूर्णाकृती महाराजांच्या पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.
प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव, विद्या खैरे, शोभनाताई चव्हाण, सलोनी शिंदे, तृप्ती साळवे, मनिषा घोलप या महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.


याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, वैद्यकीय मदत कक्षाचे ओमकार शिंदे, आनंदराव शेळके, अंबादास कल्हापूरे, घनश्‍याम घोलप, झेंडे मामा, रोहित सुपेकर, प्रथमेश भापकर, शिवा कर्डिले आदींसह युवक व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिलाताई शिंदे म्हणाल्या की, शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजात कार्य करत आहे. सातत्याने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करुन महाराजांचे विचार रुजविण्याचे कार्य केले जात आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


सुरेखा कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्व अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केले. त्यांचा स्वाभिमानी लढा व संघर्ष आजच्या युवा पिढीला दिशादर्शक असल्याचे, त्या म्हणाल्या. अश्‍विनी जाधव यांनी शिवसेनेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. शिव-पार्वतीचा सोहळा आणि शिवकालीन युध्द कलेचा थरार नगरकरांना अनुभवता येणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *