सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला जळगाव येथील आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लाल बहादुरशास्त्री आदर्श संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
23 नोव्हेंबर रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी डोंगरे यांना विशेष आमंत्रित पाहुण्याचा मान देण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष फारुक शाह नौमानी यांनी दिली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामस्थांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि तीन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी आयोजन केले होते. संस्थेला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
