• Tue. Dec 30th, 2025

75 नारळ झाडाच्या रोपांचे वाटप करुन स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी

ByMirror

Dec 12, 2025

कोल्हारला बहरणार नारळाची झाडे; जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम


स्व. गोपीनाथराव मुंडे सर्वसामान्यांच्या मनात घर करणारे लोकनेते ठरले -शिवाजी पालवे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने 75 नारळ झाडाच्या रोपांचे वाटप करुन लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील विठ्ठलनगर (टाके वस्ती) हनुमान मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमात नारळाच्या झाडाची लागवड करुन स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिक साहेबराव पालवे व रखमाजी पालवे यांच्या हस्ते नारळ झाडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अशोक गर्जे, बाळासाहेब पालवे, रोहिदास पालवे, आजिनाथ पालवे, लक्ष्मण पालवे, राजेंद्र पालवे, बाजीराव पालवे, शहादेव पालवे, लहू जावळे, बाळू जाधव, हरिभाऊ जाधव, अशोक जाधव, संभाजी जाधव, ईश्‍वर जावळे, पका पालवे, गणेश पालवे, जयसिंग पालवे, रामकिसन साबळे, शहादेव साबळे आदी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


शिवाजी पालवे म्हणाले की, स्व. गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनात घर करणारे लोकनेते होते. गावोगावी जाऊन जनतेची कामे मार्गी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भारत सरकारचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता अशी अनेक महत्वाची पदे भूषवली. मुंडे साहेबांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, सिंचन, शिक्षण, गरीबी निर्मूलन आदी विषयांवर महत्वाची कामे केली. त्यांच्या संपर्कशैलीमुळे ते जनतेचे खरे नेतृत्व ठरल्याचे त्यांनी सांगितले.


कोल्हार गावाला भविष्यात कोकणासारखा हिरवागार चेहरा द्यायचा आहे. गावात हजारो नारळाची झाडे लावून पाणी संवर्धन, सावली, उत्पन्न व पर्यावरण संवर्धन या तिन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत. आज सुरू केलेला हा 75 रोप लागवडीचा उपक्रम हरित गावाची नांदी ठरणार आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामीण जीवनात बदल घडवण्यासाठी जिद्दीने काम केले. त्यांनी शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी उभे राहून संघर्ष केला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिवाजी गर्जे यांनी स्पष्ट केले. रोहिदास पालवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *