145 पूरग्रस्त कुटुंबीयांनी घेतला लाभ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृष्णाली फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दिवाळीनिमित्त पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने संस्थेच्यावतीने एकूण 145 पूरग्रस्त कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागापूर, शितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, वसेवाडी, पिंपरखेड, घोडेगाव आणि राजूरी या गावांमध्ये घरांचे, जनावरांचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत गावकऱ्यांना आधार देण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने पुढाकार घेऊन किराणा किटचे वाटप केले.
या मदत उपक्रमात अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियंका पाटील शेळके-बोबडे, सहसचिव श्री.शिवाजी उबाळे, ज्येष्ठ समाजसेवक जयेश कांबळे, युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशांत पाटील शेळके म्हणाले की, पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही संकटाच्या काळात समाजासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रियंका पाटील शेळके-बोबडे यांनी कृष्णाली फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने सुरु आहे. फाउंडेशनच्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमास गोरख चौधरी, भिका लकडे, खजिनदार अमर बोबडे, सामाजिक कार्यकर्त्या रत्ना जाधव, तुकाराम कामठे, उद्योजक संग्राम आंधळे, उपाध्यक्ष अमोल शिंदे यांसह अनेक सहकार्य लाभले. स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कृष्णाली फाउंडेशनचे आभार मानले. हा उपक्रम खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
