विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा -मोहिनीराज गटणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे दर्शन घडविले. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील यावेळी रंगली होती.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सिनेअभिनेते मोहिनीराज गटणे यांच्या हस्ते झाले. माजी प्राचार्य रावसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे प्रांत चालक नाना जाधव, संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, सहकार्यवाह मुरलीधर पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता जगताप, प्रचार्य रवींद्र चोभे, सदस्य काजळे, मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, संभाजीराजे पवार, राजू कुलथे, अनिल झिरपे, विलास साठे, सुधाताई लाटे, कार्ले मॅडम, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, रोहिणी काजळे, अविनाश साठे आदींसह सर्व शालेय शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिनीराज गटणे म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा. फक्त मनोरंजन पुरते कार्यक्रम मर्यादीत न ठेवता मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती देखील मिळणे महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर कौशल्य आत्मासात होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षणाबरोबरच इतर कला-कौशल्य आत्मसात करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रारंभ गणेशवंदना व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, रामायण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्त्रीजीवन, अध्यात्म या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध गितांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक भारावले. उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. सुरेखा कसबे यांनी आभार मानले.