शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख यांना मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 29 सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शेख यांना सन्मानित केले जाणार आहे.
हबीब शेख अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्यातून भावी पिढी घडविण्याचे कार्य ते करत आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ते सातत्याने करत आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणाऱ्या राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आकाश तांबे यांनी दिली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास कोतकर, संस्थेचे सचिव सचिन कोतकर, भाग्योदय विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.