शहरात रास्ता रोको करुन आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केली अटकेची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर आव्हाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

श्रीराम भक्तांचे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शहर सरचिटणीस सचिन पारखे, प्रशांत मुथा, बाबासाहेब सानप, गोपाल वर्मा, मयूर जामगावकर, सचिन पावले, युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, उपाध्यक्ष स्वप्निल बेद्रे, अनुराग आगरकर, सुजय मोहिते, सोमनाथ जाधव, वैभव झोटिंग, अक्षय ढाकणे, दत्ता गाडळकर, आकाश सोनवणे, प्रज्वत लुनिया आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभू श्रीरामांबाबत आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शहरात त्याचे पडसाद उमटले. भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असून, ते प्रभू श्रीराम यांच्या भक्तांच्या भावना दुखावणारं आहे. प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्याला अटक करण्याचे त्यांनी सांगितले.