जिल्ह्यातील सर्व महिलांनी सहभागी व्हावे -अनिता काळे
महिलांच्या सक्षमीकरणासाठी रणरागिनींचा विचारमहोत्सव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य महाअधिवेशन दि. 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान चंद्रपूर येथे उत्साहात पार पडणार आहे. ‘रणरागिनींचा विचारांचा उत्सव’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अधिवेशनात महिलांच्या सक्षमीकरणावर, सामाजिक बांधिलकीवर, शिक्षण आणि नेतृत्व विकासावर सखोल चर्चा होणार आहे. या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सर्व महिलांनी सहभागी व्हावे, असे मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे-पाटील यांनी आवाहन केले आहे.
या अधिवेशनाचा शुभारंभ 21 नोव्हेंबरला चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील आणि परदेशातील जिजाऊंच्या लेकी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दिल्ली, पटना, मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली यांसह विविध राज्यांतील महिला प्रतिनिधी या अधिवेशनात विचारमंथनासाठी सहभागी होणार आहेत.
हे अधिवेशन सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय आणि बौद्धिक चर्चांनी भरलेले असेल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान विविध विषयांवर परिसंवाद, कार्यशाळा, प्रेरणादायी व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनासाठी निवडलेले चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वी गोंड राणी हिराईने स्थापन केलेले हे प्राचीन नगर, आजही आपल्या चार दरवाजे व चार खिडक्यांसह इतिहासाचे साक्षीदार म्हणून उभे आहे. चंद्रपूरला माता महाकाली मंदिर, अनचळेश्वर मंदिर, प्राचीन पर्वशनाथ जैन मंदिर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय वन अकादमी, सैनिक स्कूल, वीज निर्मिती केंद्र आणि कोळशाच्या खाणींमुळे विशेष ओळख प्राप्त झाली आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नागपूरची दीक्षाभूमी हेही येथून जवळ असल्याने उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. अधिवेशनादरम्यान या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देण्याचे आयोजनही करण्यात आले आहे.
जिजाऊ ब्रिगेड ही वैचारिक संघटना असून महिलांच्या सर्वांगीण विकास, शिक्षण, आत्मनिर्भरता आणि नेतृत्वगुण वाढविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. समाजातील स्त्रियांच्या हक्कांचे भान निर्माण करून त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आणणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. संघटनेने आतापर्यंत राज्यभरात विविध ठिकाणी प्रबोधनपर अधिवेशने व विचारमंथन शिबिरे आयोजित केली असून चंद्रपूर अधिवेशन हे त्यातील सर्वांत मोठे आयोजन ठरणार असल्याचे म्हंटले आहे.
