व्यवस्थापकीय कमिटीच्या बैठकीत निर्णय
महिलांसह सुशिक्षित युवकांसाठी वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षणाचा होणार समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जन शिक्षण संस्थेची व्यवस्थापकीय कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महिलांसह सुशिक्षित युवकांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आला.
जन शिक्षण संस्थेच्या नालेगाव येथील कार्यालयात संस्थेचे चेअरमन राहुल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी, स्नेहालयाचे सहसंचालक हनीफ शेख, उद्योजक विजय इंगळे, अनघा बंदिस्ती, पुनम देशमुख, मुख्याध्यापिका वासंती धुमाळ, संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी सय्यद शफाकत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे आदी उपस्थित होते.
या बैठकीत एप्रिल 2023 पासून संस्थेत राबविण्यात आलेल्या विविध व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर व उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. तर औद्योगिक क्षेत्राची गरज पाहून नवनवीन व्यावसायिक प्रशिक्षण सुरु करण्याचे धोरण ठरविण्यात आले. फक्त प्रशिक्षण देऊन न थांबता उद्योग-व्यवसायासाठी मार्केटिंग, व्यवसाय कसा उभा करावा, भांडवल कसे उपलब्ध करावे याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. तर उद्योग-व्यवसायसाठी शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ प्रशिक्षणार्थींना मिळण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन राहुल गुंजाळ म्हणाले की, सक्षम भारत घडविण्यासाठी युवक-युवतींच्या हाताला रोजगार आवश्यक आहे. या उद्देशाने जन शिक्षण संस्थेचे कार्य सुरु आहे. युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध प्रशिक्षणातून त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ग्रामीण भागातील युवक-युवती व महिलांना या प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टीकोनाने नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर अहमदनगर जिल्ह्यात जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
हनीफ शेख यांनी महिला आर्थिक सक्षम झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. महिलांना विविध प्रशिक्षण देऊन उद्योग, व्यवसायात उभे करण्याचे जन शिक्षण संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनघा बंदिस्ती म्हणाल्या की, इंडस्ट्रीजची गरज ओळखून त्या दृष्टीकोनाने व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्राला कुशल कामगार मिळणार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. विजय इंगळे यांनी वेल्डर वायरमन हा कोर्स पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना इंडस्ट्री मध्ये प्लेसमेंट देण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी 2005 पासून आजपर्यंत जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 35 हजार पेक्षा जास्त महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तर बहुसंख्य महिला व युवतींनी आपले यशस्वी व्यवसाय उभे केले आहे. ग्रामीण भागात देखील गावी-गावी जावून प्रशिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. युवकांसाठी देखील व्यावसायिक प्रशिक्षणाचा समावेश असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.आर.एस. गुंजाळ इन्स्टिट्यूटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.