शाहिरी व व्याख्यानातून अभिवादन
फुले दांपत्यांनी महिला सक्षमीकरणाची पायाभरणी केली -ॲड. महेश शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी, आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांच्या जीवनावर शाहिरी व व्याख्यानातून प्रकाश टाकण्यात आला. तर मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
प्रारंभी माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, ॲड. सुनील महाराज तोडकर, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धनाजी बनसोडे, पोपट बनकर, जयश्री शिंदे, व्याख्याते प्रा. स्वाती सुडके, रजनी ताठे, दिनेश शिंदे, रवी सातपुते, रवी सातपुते, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले, संपत मोरे, अशोक डोंगरे, प्रकाश फराटे, आदी उपस्थित होते.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य समाजाला दिशा देणारे असून, फुले दांपत्याने स्त्रियांच्या जीवनातील अंधकार प्रकाशरुपी शिक्षणाने दूर केला. महिला सक्षमीकरणाची पायाभरणी त्यांनी केली. आयुष्यभर संघर्ष करून समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा मोडीत काढून समाज जागृतीचे कार्य केले. त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. सुनील तोडकर यांनी समाजातील अनिष्ठ, प्रथा मोडून शिक्षणरूपी ज्ञान अवगत केले पाहिजे. शिक्षणाने संपूर्ण मानव जातीचा उद्धार होत असल्याचे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून सिध्द झाले. त्यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची मूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याने समाज सावरला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. शाहीर कान्हू सुंबे यांनी शाहीरीतून प्रबोधन केले. तर प्रा. स्वाती सुडके यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान दिले.