विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या जीवनचरित्रावर पुस्तकांचे वाटप
शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या उध्दारासाठी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा व्याख्यानाच्या माध्यमातून जागर करुन विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या जीवनचरित्रावर पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
नवनाथ विद्यालय येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, सुवर्णा जाधव, तृप्ती वाघमारे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, संस्थेचे सचिव मंदाताई डोंगरे, लहानबा जाधव, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सावित्रीबाईंनी बहुजन समाजातील मुलींना शिक्षणाची दारे खुली करुन दिल्याने समाजाची प्रगती झाली. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी असून, आज देखील शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार आहे. शिक्षणाने आदर्श नागरिक घडत असून, सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडी करुन दिल्याने महिलांचा सन्मान वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांचा उध्दार केला. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजच्या कर्तुत्ववान स्त्रीचे श्रेय सावित्रीबाई यांना जाते. जयंतीदिनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.