रविवारी निमगाव वाघात रंगणार साहित्यिकांचा मेळावा
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून खासदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. गावातील परिवार मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता खासदार लंके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेच्या फलकाचे अनावरण केले जाणार आहे.
संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी खासदार लंके यांना निवडीचे पत्र दिले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, हे दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनात राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी उपस्थित राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने होणार आहेत. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार आहे.