प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते -राज देशमुख
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. तर नृत्याविष्कारातून विविध सामाजिक विषयांवर जागृती केली. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर ठेका धरुन एकच धमाल केली. सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली.

सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चांगुलपणा चळवळ संस्थेचे संस्थापक राज देशमुख, अशोक सचदेव, अली देखाणी, स्टीफन सर, गुरुकुलचे संचालक आनंद कटारिया, संचालिका निकिता कटारिया आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात आनंद कटारिया म्हणाले की, शाळेची स्थापना इंद्रभान डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 13 वर्षे शाळेला पूर्ण झाले असून, 25 मुलांपासून सुरू झालेल्या शाळेत 500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेची भव्य इमारत उभी राहत आहे. भौतिक सुविधा निर्माण करून देताना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज देशमुख म्हणाले की, मुलांमधील क्षमता ओळखा, शिक्षण दुय्यम गोष्ट आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्त्वाचे ठरतात. प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते व माणूस जीवनात उभा राहतो. जे.एस.एस. गुरुकुल मुलांना जीवनात उभे करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अली देखाणी यांनी मुलांनी स्पर्धेत धावण्यापेक्षा आपल्यातील क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी मुलांचे कलाकौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले.
अशोक सचदेव म्हणाले की, मुलांनी किती व कोणत्या डिग्री मिळवल्या यापेक्षा त्यांच्यात संस्कार रुजवून आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. सर्व डिग्री घेतात मात्र आत्मविश्वास नसल्याने त्यांच्या हाती निराशा येते. मोठ-मोठ्या डिग्री घेऊन देखील छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणारे अनेक युवक समाजात आहेत. यासाठी स्वत:ला ओळखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्व. सतीश कटारिया यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट विद्यार्थीचा पुरस्कार संस्कृती सुर्यवंशी व विरम कोठारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाळेचा वार्षिक अहवाल निकिता कटारिया यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न बोरा यांनी केले. आभार रवी उजागरे यांनी मानले.