• Wed. Oct 15th, 2025

पर्यावरण संवर्धनासाठी 500 कुटुंबांचा निसर्गपाल कुटुंब म्हणून सहभाग

ByMirror

Jun 26, 2024

प्रत्येक निसर्गपाल घराच्या अंगणात फुलविणार केशर आंब्याचे झाड

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या चळवळीत जिल्ह्यातील 500 कुटुंबांना निसर्गपाल कुटुंब म्हणून सहभागी करून घेण्यात आले. मनसुखलाल सुरजमल गांधी (वांबोरीवाला) यांच्या 82 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक निसर्गपाल कुटुंबीयांनी घराच्या अंगणात केशर आंब्याचे झाड लावून त्याचे संवर्धन करणार असल्याचा निर्णय घेतला.


निसर्गपाल चळवळीचे अशोक सब्बन, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, चंद्रकांत चुत्तर, विजय गांधी, आरिफ शेख, अशोक भोसले इत्यादी कार्यकर्त्यांनी नगरच्या पटेल वाडीत झालेल्या कार्यक्रमात मनसुखलाल गांधी यांचा लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने सन्मान केला.


अशोक सब्बन म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंग आणि कोरोनाच्या महामारीने जगभरातील जात, धर्मपंथ संपले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण मानवजात धोक्यात आली आहे. या संकटातून वाचण्यासाठी निसर्गपाल हा एकमेव धर्म आचरणात आणण्याची गरज आहे. प्रत्येक निसर्गपाल व त्याच्या कुटुंबाने ग्लोबल वॉरफुटींगवर प्लँटेशन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

ॲड. अशोक कोठारी म्हणाले की, मनसुखलाल गांधी हे जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे व्यक्तीमत्व आहे. निसर्गाची आवड असल्याने त्यांनी सातत्याने पर्यावरण संवर्धन चळवळीत योगदान दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश थोरात यांनी निसर्गपाल एकवटल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. या चळवळीत गांधी यांचे प्रेरणादायी कार्य दिशादर्शक ठरणार असल्याचे सांगितले.


ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, निसर्गपाल कुटुंबातील सदस्यांनी आपल्या घराच्या अंगणात केशर आंब्याचा झाड लावावा, यासाठी लोकभज्ञाक चळवळ प्रयत्नशील आहे. मनसुखलाल गांधी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती दिली. मनसुखलाल गांधी यांनी सत्काराला उत्तर देताना निसर्गपाल चळवळ अधिक व्यापक करण्याचे आश्‍वासन दिले.
यापुढे वाढदिवस, लग्न समारंभ, जयंती उत्सव, पुण्यतिथी आणि सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपण व संवर्धनाला प्रतिसाद देऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचे आवाहन संदीप पवार यांनी केले. यावेळी कैलास पठारे, सुधीर भद्रे, सुनील टाक, बाळू पाळवे, पोपट साठे आदींनी निसर्गपाल चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी जितेंद्र गांधी, संजय गांधी, पंकज गांधी, हर्षल गांधी, सुभाष शिंदे, डॉ. साळवे, किरण रोकडे, राजू खरपुडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *