पावसाळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप
नंदी म्हणजे धर्माचा प्रतीक, त्याचे रक्षणही महत्त्वाचे -महंत एकनाथ महाराज
नगर (प्रतिनिधी)- ओजस्वी भारत फाउंडेशनच्या वतीने हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथे महाराष्ट्रातील पहिल्या नंदी आश्रम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजर्षी महंत एकनाथ महाराज (आयोध्या धाम) यांच्या हस्ते नंदी आश्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी छत्रीचे वाटप करण्यात आले.

हिवरगाव पावसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना छत्री व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी राजर्षी महंत एकनाथ महाराज म्हणाले की, देशाची महासत्तेकडे असलेली वाटचाल राज्यघटनेमुळे शक्य झाली आहे. गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या हुद्दयावर नोकरी करत आहे. त्यांना मान-सन्मान मिळत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ते भगवान गौतम बुद्धांच्या अध्यात्मिक विचारांपुढे नतमस्तक झाले. अध्यात्माच्या पुढे ज्ञान नतमस्तक होते. म्हणून विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक असावे मात्र अंधश्रद्धा बाळगू नये, असा संदेश त्यांनी दिला.
तसेच नंदी आश्रम शाळेचे उद्घाटन प्रसंगी बोलताना एकनाथ महाराज यांनी भारतभर सर्वत्र गोशाळा आहे. परंतु नंदी शाळा कोठेच नव्हती. नंदीचे महत्त्व समाजाला अजूनही समजले नाही, नंदी म्हणजे धर्माचा प्रतीक आहे. नंदी शिव भगवान यांचे वाहन आहे. कैलासाचा द्वारपाल नंदी असून, कसायाच्या हातून नंदी वाचवण्यासाठी हिवरगाव पावसा येथे नंदी आश्रम शाळा सुरू केली आहे. फाउंडेशनच्या मार्फत भारतभर नंदी आश्रम शाळा उघडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर देशी गोवंशाचा संख्यात्मक ऱ्हास होत आहे. हा चिंतनाचा विषय असून, देशी नंदीचे संवर्धन करण्यासाठी देशी प्रजातीचे नंदी या शाळेत दाखल करण्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदिप सरवार, राजस्थान प्रदेशाध्यक्ष सुरेश कुमार सिंग, राष्ट्रीय जनरल सचिव मधुकर रहाणे, राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रमिला बांगर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष उत्तम नाना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विकास हासे, संगमनेर तालुकाध्यक्ष महेश पावसे, संगमनेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे, सरपंच सुभाष गडाख, वृक्षमित्र गणपत पावसे, शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, डॉ. रमेश पावसे, देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उगले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नगरे, कैलास दिवटे, सोमनाथ दवंगे आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.