मैदानी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवली क्रीडा कौशल्याची चुणूक
खेळातूनही उज्ज्वल करिअर घडविता येते -ज्ञानेश्वर खुरंगे (जिल्हा क्रीडा अधिकारी)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला परिसरातील हिंदी माध्यमाच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रशस्त प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे संपूर्ण शालेय वातावरण क्रीडामय बनले आहे.
या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते मैदानाचे विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी आकाशात फुगे सोडून स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव किशोर मुनोत, मुख्याध्यापक सुहास धीवर, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब बोडखे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजली स्वामी यांच्यासह परीक्षित सुने, ठाकुर परदेशी, गोपीचंद परदेशी, नुतन आदक, कविता जोशी, कमल भोसले, सुदेश छजलानी, मोनिका मेहतानी, वैभव शिंदे, शिल्पा पाटोळे, शिक्षकेतर कर्मचारी योगेश गायकवाड आदी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव किशोर मुनोत म्हणाले की, खेळामुळे शारीरिक क्षमता वाढते तसेच जीवन आनंदी व आरोग्यदायी बनते. विद्यार्थी दशेत मैदानी खेळ खेळले तरच उद्याचे सक्षम आणि सुदृढ नागरिक घडू शकतात. सदृढ शरीराचा पाया मैदानी खेळ असून प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे मैदानात उतरले पाहिजे. खेळामध्ये जय-पराजय महत्त्वाचा नसून, स्पर्धेत सहभागी होणे व आपल्यातील कौशल्य सादर करणे अधिक महत्त्वाचे आहे. आयुष्यात शिक्षणाइतकेच खेळालाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, खेळांमुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधली जाते. निरोगी जीवनासाठी लहान वयात मैदानावर घाम गाळणे आवश्यक आहे. खेळातूनही उज्ज्वल करिअर घडविता येते, अनेक क्लास वन अधिकारी खेळाच्या माध्यमातून पुढे आले आहेत. यासाठी सातत्यपूर्ण मेहनत व खेळाची तपश्चर्या आवश्यक आहे. जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक 14 राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून, लवकरच कबड्डीची राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण जिल्हा क्रीडामय झाला असून अनेक गुणवंत खेळाडू पुढे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक कमल भोसले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय बाबासाहेब बोडखे यांनी करुन उपस्थितांचे स्वागत केले. दोन दिवस रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, लंगडी यांसारख्या सांघिक तसेच धावणे, गोळा फेक, उंच उडी, लांब उडी आदी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीचंद परदेशी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक सुहास धीवर यांनी मानले.
