सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम; महिनाभर महिलांना मिळणार पार्लरचे अद्यावत प्रशिक्षण
कौशल्य आत्मसात करुन समाजातील एकल महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे व जीवनात पुढे जावे -आशिष येरेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य आत्मसात करुन समाजातील एकल महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे व जीवनात पुढे जावे. अर्थिक सक्षम होण्यासाठी विविध कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. यामुळे महिलांना आत्मनिर्भर होता येणार आहे. स्वत:मध्ये क्षमता निर्माण केल्यास एकल महिलांची प्रगती साधली जाणार आहे. एकल महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षणाने आपले भवितव्य घडविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सेंट- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने एकल महिलांसाठी एक महिन्याचे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन येरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर सोमनाथ जगताप, प्रोजेक्ट डायरेक्टर सुशीलकुमार पठारे, सेंट्रल बँकचे रिजनल हेड शैलेंद्रकुमार सिन्हा, प्रशिक्षण संस्थेचे संचालक अभिनव कुमार, पार्लरच्या प्रशिक्षिका कविता डोंगरे आदींसह एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात अभिनव कुमार म्हणाले की, जीवनात वेळ महत्वाचा आहे. त्याचा उपयोग करून महिलांनी यशस्वी व्हावे. योग्य वेळी घेतलेला निर्णय जीवनाला दिशा देतो. एकल महिलांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करावे करुन नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शैलेंद्रकुमार सिन्हा म्हणाले की, व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळते. एकल महिलांकडे भांडवल नसले तरी, स्वत:चा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी कौशल्य विकसीत करण्याची गरज आहे. आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घ्यावे व ज्या उद्देशाने कर्ज घेतले त्या व्यवसायासाठी त्याचा उपयोग करण्याचे सांगून, त्यांनी महिला व एकल महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
30 दिवसीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरात एकल महिलांना पार्लरचे बेसिक व एडवांस प्रशिक्षण तज्ञांकडून प्रात्यक्षिकासह दिले जाणार आहे. तसेच महिलांनी कॉस्मेटोलॉजीच्या अद्यावत सौंदर्य तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. या प्रशिक्षण शिबिराला शहरासह ग्रामीण भागातील एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.