• Tue. Jul 22nd, 2025

गुलमोहर रोडला भाजप शहर महिला मोर्चाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ByMirror

Nov 27, 2023

संविधानाचे पूजन करुन उद्देशिकाचे वाचन; मन की बात कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप महिला मोर्चाची शहर कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, गुलमोहर रोड येथील पारीजात चौकात भाजप शहर महिला मोर्चाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी महापौर बाबासाहेब वाकळे व जेष्ठ नेते वसंत लोढा यांच्या हस्ते झाले. तर प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे यांनी महिला मोर्चाची कार्यकारणी जाहीर केली.


संविधान दिनी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संविधानाचे पूजन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते करुन, संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. तर 26-11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक भैय्या गंधे, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य विवेक नाईक, नगरसेवक रामदास आंधळे, मंडल अध्यक्ष नितीन शेलार, उपाध्यक्षा सुजाता औटी, निता भाळवणकर, रेखा मैड, कुसुम शेलार, सरचिटणीस रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, श्‍वेता झोंड, सविता तागडे, अर्चना बनकर, सुपर्णा देशमुख, प्रतिभा पेंडसे, सुजाता बोरसे, उषा तरटे, मंगला बोरसे, नुतन कांबळे, सुवर्णा दुधाट, सुवर्णा कुलकर्णी, दिपाली जोशी, मोहिनी गोंगले आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


महिला मोर्चाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी संपर्क कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम रंगला होता. यावेळी महिला वर्ग व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला मोर्चाच्या जम्बो कार्यकारणीत 12 उपाध्यक्षा, 3 सरचिटणीस, 12 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 2 प्रसिद्धी प्रमुख व 30 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


अभय आगरकर म्हणाले की, सर्व समावेशक असे संविधान भारताला मिळाले असून, भारताचा राज्य कारभार संविधानाने चालविला जात आहे. भाजपला महिलांसह युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला जात आहे. शहरात महिलांचे सुरु असलेले संघटन कौतुकास्पद आहे. भाजप महिला मोर्चाच्या कार्यकारणीत सर्व जाती-धर्मातील महिलांना संधी देऊन समतोल साधला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रिया जानवे म्हणाल्या की, संविधान दिनी भाजप शहर महिला मोर्चाचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तर सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या महिलांना कार्यकारणीत विविध पदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. महिला पदाधिकारी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहेत. हे संपर्क कार्यालय नागरिक व महिला वर्गासाठी एक मदत कक्ष म्हणून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपचे ध्येय-धोरण महिला घराघरापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिल निकम यांनी विश्‍वकर्मा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता कुलकर्णी यांनी केले. आभार सुजाता औटी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *